जळगावात २९ वर्षीय तरुणाची नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील मेहरूण तलाव परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनय अशोक देशमुख (वय २९, रा. मोहन नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळपासून गायब असलेल्या विनयचा मृतदेह सायंकाळी सातच्या सुमारास तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विनय देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. शहरातील एका झेरॉक्स कॉपी विक्रीच्या दुकानात ते काम करत होते. त्यांचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनय घरातून निघाले. कुटुंबीयांना वाटले की, तो कामावर गेला आहे. मात्र, दिवसभर त्याचा काहीही पत्ता लागला नाही. तो दुकानातही गेला नव्हता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता, त्याची दुचाकी मेहरूण तलाव परिसरात आढळून आली.

दुचाकी आढळल्यानंतर विनयने आत्महत्या केल्याचा संशय अधिक गडद झाला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. दिवसभर शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. अखेर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास विनयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विनयला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून एमआयडीसी पोलीस स्थानकात केली आहे. या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, आई-वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत असून, आत्महत्येमागचे कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची चौकशी सुरू केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post