स्थानिक नगरसेवकांकडून केवळ आश्वासने; आता प्रशासकांकडे थेट विनंती, २५ ते ३० वर्षांपासून रहिवास असूनही नाल्या व पक्क्या रस्त्यांची सुविधा नाही, नागरिकांची महापालिकेत तक्रार दाखल
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील गट नं. 75/1+2, जळगाव शिवार येथील नागरिकांनी त्यांच्या परिसरातील नाल्यांची आणि रस्त्यांची अत्यंत दयनीय स्थिती लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनावर परिसरातील तब्बल २८ नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपली व्यथा मांडली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नागरिक गेली २५ ते ३० वर्षे त्या भागात वास्तव्यास आहेत व दरवर्षी नियमितपणे महापालिकेचा कर भरतात. तरीदेखील आजतागायत त्यांना मूलभूत नागरी सुविधा – रस्ते आणि नाल्यांचे काम मिळालेले नाही.
सांडपाण्यामुळे आजारांचा धोका
नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी मोकळ्या भूखंडांमध्ये साचते आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रचंड उपद्रव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
मुरुम रस्त्यांची दुर्दशा
सन २०१९ मध्ये फक्त मुरुमाचे रस्ते तयार करण्यात आले होते, मात्र आज सहा वर्षांनंतर हे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे चिखल व पाण्याचे साचलेले स्वरूप यामुळे अपघात घडत आहेत.
नगरसेवकांकडून केवळ आश्वासने
यापूर्वी स्थानिक नगरसेवकांना अनेकवेळा तक्रारी करून देखील फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कामे झाली नाहीत. आता प्रशासक कार्यरत असल्याने त्यांच्याकडे थेट लेखी तक्रार देण्यात आली आहे.
यावेळी दिनेश भारंबे, संजय खडके, रेखा खडके, मोहन चौधरी, बाळू पाटील, कैलास भावसार, मंगला तळवदे, रवींद्र पाटील, जगदीश नेहते, मोनिका देशमुख, गायत्री पाटील, सुनील पाटील, उत्तरा खाचणे, भगवान बारी, लीलाधर बोंडे, छाया नेवे, सुनिता कोळी, अभय नारखेडे, कल्पना चौधरी, कल्पना दुसाने, देवयानी जावळे, विठ्ठल चोपडे, सुरेखा नारखेडे, मनीषा नारखेडे, ललित पाटील, दिपाली शिंपी, सीमा पाटील आदींनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
Tags
जळगाव