खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील आर.आर. विद्यालयात शुक्रवारी दुपारी खेळत असताना नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज ११ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कठोरा, जि. बुलढाणा, ह.मु. कासमवाडी, जळगाव) असे आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
नेहमीप्रमाणे कल्पेश आज सकाळी शाळेत गेला होता. दुपारी ३ वाजता सुट्टीदरम्यान इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला, अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. शिक्षकांनी तातडीने त्याला जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, कल्पेशच्या मृत्यूनंतर शाळेत शोककळा पसरली आहे. त्याचे आई-वडील आणि भावाने रुग्णालयात एकच आक्रोश केला.
मात्र, या मृत्यूमागे फक्त अपघात नसून कोणीतरी मारहाण केली असावी, असा संशय मृताच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. "तो सकाळी पूर्णपणे ठणठणीत होता, दोन दिवसांपूर्वी त्याचा इतर विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता. त्यामुळे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे," अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, "तपास होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
जिल्हा पेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags
जळगाव