जळगावातील प्रोफेसर कॉलनीत कुंटणखान्यावर एलसीबीचा छापा; बांगलादेशी तरुणीची सुटका

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत एका २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई मंगळवारी दि. २३ रोजी करण्यात आली. अटक केलेली महिला पूजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव) असून तिच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी जळगावातील सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या गुन्ह्याची माहिती देत तक्रार दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.

यानुसार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीच्या पथकाने जिल्हापेठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे कारवाई करत प्रोफेसर कॉलनीतील संशयित घरावर छापा टाकला. दरम्यान, पूजा जाधव हिने दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी ओळख सांगून घराची झडती घेतली. त्यावेळी तेथे २५ वर्षीय बांगलादेशी तरुणी आढळून आली.

सदर तरुणीची विचारपूस केल्यावर, तिने सांगितले की २३ जुलै रोजी नाशिक रेल्वे स्थानकावर असताना पूजा जाधव हिने तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जळगावला आणले. मात्र, येथे आणल्यानंतर जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले, असा जबाब तिने पोलिसांना दिला.

पोलिसांनी घटनास्थळावरून संबंधित मुद्देमाल जप्त करत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, नितीन बाविस्कर तसेच जिल्हापेठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस हेडकॉन्स्टेबल भारती देशमुख आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post