महावितरणच्या सक्तीच्या स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा – तीव्र आंदोलनाचा इशारा

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - महावितरण कंपनीकडून जळगाव शहरात सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये पोस्टपेड स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात असून, हे नागरिकांच्या विरोधात अन्यायकारक असून आर्थिक पिळवणूक करणारे पाऊल असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने केला आहे. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात महावितरणला इशारा देण्यात आला की, जर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवली नाही, तर जनआंदोलन छेडण्यात येईल.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले होते की, पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही. नागरिकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महावितरणच्या कंत्राटी कामगारांकडून नागरिकांवर दबाव टाकला जात आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास नकार दिल्यास जुन्या मीटरचे रीडिंग घेण्यास येणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. ही पद्धत म्हणजे थेट नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना येणाऱ्या विजेच्या बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यापूर्वी ज्या ग्राहकांना दोन महिन्यांचे फक्त २००-३०० रुपयांचे बिल येत होते, त्यांना आता महिन्याला तब्बल १२००-१३०० रुपये इतके बिल येत आहे. काही ठिकाणी पाचपट अधिक रीडिंग दाखवले जात असल्याच्या तक्रारी देशभरातून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे मासिक बिल ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महावितरणला इशारा दिला आहे की, स्मार्ट मीटर लावण्याचा हा प्रकार म्हणजे 'गोरखधंदा' असून, तो तात्काळ थांबवावा. अन्यथा संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजु मोरे, संग्राम सूर्यवंशी, डॉ. रिझवान खाटीक, रिंकू चौधरी, आकाश हिवराळे, चेतन पवार, नईम खाटीक आणि गोटू चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्मार्ट मीटरविरोधातील ही लढाई केवळ तांत्रिक बाब नसून, ती सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठीचा संघर्ष असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे. महावितरण कंपनीने नागरिकांच्या सहमतीशिवाय कोणतीही सक्ती करू नये, अन्यथा लोकशक्तीचा सामना करावा लागेल, असा ठाम इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post