खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार -
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिक यांना ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज सकाळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीच्या धुळे पथकाने सकाळच्या सुमारास राबवली. अटकेनंतर दोघांविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे ६१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सुनेने, जी सद्य:स्थितीत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे, प्रसूती रजेचा अर्ज २ जून रोजी मुख्याध्यापिकेकडे वैद्यकीय प्रमाणपत्रासह सादर केला होता. त्यानंतर तक्रारदारांनी मुख्याध्यापिकांची भेट घेतली असता, प्रत्येकी ६ हजार रुपये प्रतिमहिना या हिशोबाने ६ महिन्यांसाठी एकूण ३६ हजारांची लाच मागण्यात आली.
त्यानुसार, तक्रारदारांनी ७ जून रोजी धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान, कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७, रा. उदळी) यांनी लाच स्वीकारताच मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय ५७, रा. खिरोदा) यांनाही तत्काळ अटक करण्यात आली.
ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
जळगाव