नातवाच्या क्रूरतेचा कळस – शेअर गुंतवणुकीवरून आजीवर कुऱ्हाडीने वार, अखेर आज वृद्धेचा मृत्यू

पुण्यात उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू; धरणगावात खळबळ

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धरणगावात घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) यांचे पुण्यात उपचार सुरू असताना ८ जुलै रोजी दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणातील गुन्हा आता खुनामध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

घटनेचा तपशील:
लिलाबाई विसपुते यांनी त्यांच्या नातवाने तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) याने शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे त्याला अनेकदा समज दिली होती. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. संतप्त झालेल्या तेजसने झोपलेल्या आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर तेजसने आजीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करताच तेजसनेच हल्ला केल्याचे उघड झाले आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

गंभीर जखमी अवस्थेत लिलाबाई यांना तत्काळ पुण्यात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, ८ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने धरणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post