एसटी बसचा पुन्हा भीषण अपघात, पहाटेच्या सुमारास घडली होती घटना

वारीहून परतणाऱ्या ५२ भाविकांपैकी १५ जण किरकोळ जखमी

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळ आज (दि. ७ जुलै) पहाटेच्या सुमारास एक एसटी बस भीषण अपघाताला सामोरी गेली. पंढरपूरहून आषाढी वारी आटोपून परतणाऱ्या भाविकांची ही बस होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच ४० वाय ५८३०) पंढरपूरहून ५२ भाविकांना घेऊन परतीच्या प्रवासात होती. पहाटे अंदाजे १.४५ वाजता चिखली येथील महाबीज प्रक्रिया केंद्राजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळून उलटली. रात्रीची वेळ असल्यामुळे अनेक प्रवासी झोपेत असतानाच ही घटना घडली, त्यामुळे बसमध्ये एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ चिखली आणि बुलढाणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून गंभीर धोका नाही.

या अपघातात कोणाचाही जीव न गेल्यामुळे भाविकांनी "पांडुरंगाच्या कृपेने आम्ही वाचलो," अशी भावना व्यक्त केली. मात्र या घटनेमुळे वारीहून परतणाऱ्या अन्य प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला का, याचीही तपासणी केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post