खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी वन विभागाच्या सहकार्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून हरणाचे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने गुरुवारी दुपारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे, पोकॉ राकेश पाटील व गजानन पाटील यांना दुचाकी (क्र. MP 10 NC 4857) वरून टाक्यापाणी, वरला येथील वांगऱ्या बारेला आणि त्याचा साथीदार वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. वन्यप्राण्याच्या तस्करीशी संबंधित माहिती मिळताच वन विभागालाही तत्काळ कळवण्यात आले.
त्यानुसार, फॉरेस्ट कंपार्टमेंट बोरअजंटी ते वैजापूर रस्त्यावर बुधवारी (दि. १७ जुलै) दुपारी १२ वाजता नाकाबंदी करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सफौ राजू महाजन, तसेच पोलीस व वन विभागाचे अधिकारी–कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली.
नाकाबंदी दरम्यान संशयित दुचाकी थांबवून चौकशी केली असता त्यांनी स्वतःची नावे वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८) व धुरसिंग वलका बारेला (वय ४५, दोघेही रा. मध्यप्रदेश) अशी सांगितली. त्यांच्याकडे हरणाचे मांस व दोन शिंगे आढळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
जळगाव