खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे नवे विभाग नियंत्रक म्हणून धुळे येथील विभाग नियंत्रक विजय गीते यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांना जळगाव विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विभागातील सध्याची परिस्थिती जाणून घेत, प्रवासी हित लक्षात घेऊन महसूल वाढीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याआधी जळगाव विभागात लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेबाबत कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची तडकाफडकी कार्यमुक्ती करण्यात आली होती.
विजय गीते यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचार निवारण समिती व एसटी कामगार सेनेकडून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार सेनेचे आर. के. पाटील यांनी, "जळगाव विभागात धुळे पॅटर्न राबवून विभागाचा नावलौकिक वाढवावा," अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रशासनाच्या कार्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन देत कामगार सेनेचे गोपाळ पाटील म्हणाले, "एसटी महामंडळाच्या प्रगतीसाठी सर्व संघटना प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील."
या कार्यक्रमाला भ्रष्टाचार निवारण समितीचे सुरेश चांगरे, दिलीप सूर्यवंशी, अजमल चव्हाण, सुनील विसावे व जयवंत अहिरे आदी उपस्थित होते.
Tags
जळगाव