खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील एका महिला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीला अपहरण करून अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरुवारी (१७ जुलै) रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, संशयित रिक्षाचालक सलमान अहमद निजाम (वय २४, रा. गेंदालालमील) हा गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनीचा मोबाईलवरून पाठलाग करत होता. तिने वारंवार नकार दिला असून, आपले लग्न ठरल्याचेही सांगितले होते. मात्र तरीही संशयिताने त्रास देणे थांबवले नव्हते.
गुरुवारी दुपारी १२.३० वाजता कॉलेज सुटल्यानंतर सलमानने विद्यार्थिनीला जबरदस्तीने आपल्या रिक्षात (एमएच १९ सीडब्ल्यू १६५२) बसवले आणि कोर्ट चौकमार्गे खान्देश सेंट्रल मॉलकडे नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न करण्यात आला.
या दरम्यान परिसरातील काही तरुणांनी हा प्रकार हेरून रिक्षाचालकाला तात्काळ रोखले. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सलमान अहमद याला ताब्यात घेतले.
पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपहरण व जबरदस्तीचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Tags
जळगाव