खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंद नगर लाठी शाळेच्या मागे असलेल्या मानेश्वर महादेव मंदिरातील चांदीचे मुकुट व इतर दागिन्यांची चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी गेलेला सुमारे ६१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मंदिरासमोरील घरात राहत असलेले अरुण लक्ष्मण शेटे हे मंदिराच्या सेवा व्यवस्थेतील असून सण-उत्सवावेळी वापरले जाणारे चांदीचे मुकुट व दागिने त्यांच्या घरी सुरक्षित ठेवले जात होते. शेटे हे नुकतेच आपल्या कुटुंबासह पुण्याला मुलाकडे गेले असताना, त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महादेवाच्या पिंडीवरील चांदीचे मुकुट आणि अन्य दागिने चोरी केले. याप्रकरणी ११ जुलै २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५०८/२०२५ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांचा समावेश होता. तपासादरम्यान परिसरातील तसेच रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यातून दोन संशयित आरोपींची ओळख पटली.
सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या चेहऱ्यांची पडताळणी करून पोलिसांनी शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी, जळगाव) आणि राहुल शेखर रावळकर (वय ३२, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ. गिरीश पाटील आणि पोकॉ. योगेश घुगे करत आहेत.
Tags
जळगाव