सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीविरोधात परिचारिका संघटना आक्रमक; बेमुदत संपाचा इशारा

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गाच्या वेतनातील त्रुटी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी (दि. १७ जुलै) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे परिचारिका संवर्गातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी १९ परिचारिकांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले, तर उर्वरित ३०० कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध व्यक्त केला. हे कर्मचारी १८ जुलैपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

दुपारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी संघटनेच्या मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आणि रुग्णहित लक्षात घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (मुख्यालय लातूर) दिनांक १५ व १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आणि निदर्शने केली होती. त्यानंतर १७ जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले. मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने संघटनेने १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाने ६ जून रोजी कंत्राटी भरतीसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला होता, ज्याला राज्यभरातून तीव्र विरोध झाला आणि अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पदनिर्मिती आणि पदोन्नतीबाबत शासन दुर्लक्ष करत असल्याने परिचारिका वर्गात तीव्र नाराजी आहे.

या आंदोलनाची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी आणि खजिनदार अक्षय सपकाळे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post