खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रविवारी दुपारी जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
धीरज दत्ता हिवराळे (वय २७) आणि कल्पेश वसंत चौधरी (वय २५) यांच्यात जुन्या वादातून वादावादी झाली. हा वाद वाढत जाऊन दोघांनीही धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात धीरज हिवराळे याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर कल्पेश चौधरीच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांची धाव, नातेवाईकांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला. जिल्हा रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृत धीरज हिवराळेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता.
परिसरात तणाव, पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर सम्राट कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात केली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवली जात आहे. “दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण उघड होण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
Tags
Jalgaon