घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांची पाहणी
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - कन्नड-चाळीसगाव महामार्गावरील कन्नड घाटाखाली महामार्ग पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३९ किलो अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त करण्यात आले आहेत. या ड्रग्जची अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य सुमारे ६० कोटी रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजावरून समोर आले आहे. ही कारवाई पीएसआय शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, ब्रेझा गाडी ही अमली पदार्थ घेऊन बेंगळुरूहून दिल्लीकडे जात होती. दिनांक २४ जुलै रोजी रात्री १० वाजल्यानंतर सुरू झालेली ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. तपास आणि पंचनामा रात्रीच पार पडला असून, घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथक देखील हजर होते. पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि शिस्तबद्ध पद्धतीने तपास सुरू ठेवला आहे.
या गाडीतील व्यक्तींचा व ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. महामार्ग पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यामुळे संभाव्य समाजविघातक घटना रोखण्यात यश मिळाले आहे, असे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यात ड्रग्ज व केटामाईन संबंधित प्रकरण समोर आल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि शहर पोलिस निरीक्षक अमित मनेळ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व तपास कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रकरणामुळे ड्रग्ज तस्करीचा मोठा सुळसुळाट उघडकीस आला असून, पोलिस व गुप्तचर विभाग यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांकडून पुढील तपास अत्यंत गुप्तता व काटेकोर पद्धतीने सुरू आहे.
Tags
जळगाव