खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - राज्यभरात सुरू असलेल्या पोलीस खात्यातील बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अखेर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यालाही कायमस्वरूपी निरीक्षक मिळाला आहे. मागील सुमारे दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावर आता अमित मनेळ यांनी नियुक्ती स्वीकारली असून, त्यांनी १ जुलै रोजी पदभार घेतला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत अधिक परिणामकारकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी, चाळीसगाव शहरातील एका खाजगी शिकवणी केंद्राच्या चालकाकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणामुळे शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची तातडीने बदली करण्यात आली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर निरीक्षक पद रिक्त राहिल्याने ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडून सांभाळला जात होता.
जळगाव जिल्ह्यात महत्त्वाचे मानले जाणारे चाळीसगाव पोलीस ठाणे हे पूर्वी आकर्षणाचे केंद्र होते. मात्र, अलीकडच्या घटनांमुळे येथे जबाबदारी घेण्यासाठी अधिकारी इच्छुक नसल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे नवीन निरीक्षकाची नेमणूक केव्हा होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते.
अखेर, यास सर्वांना प्रतीक्षा असलेल्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला असून, अनुभवी अधिकारी अमित मनेळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी एसआयडी विभागात आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात निरीक्षकपदी काम करताना गुन्हे अन्वेषण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
चाळीसगाव शहरातील व्यापारी वर्ग, नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून त्यांच्या स्वागताची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कायदा आणि शिस्त अधिक बळकट होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
Tags
जळगाव